ठाणे : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत ठाणे पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल ३९ कोटी ३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा आणि सुमारे ६०० किलो वजनाचा जप्त अंमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, मेफेड्रोन, चरस, ब्राऊन शुगर तसेच मोठ्या प्रमाणातील कफ सिरपचा साठा नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक परिसरातील अधिकृत प्रकल्पात वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करण्यात आला.
केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने ही विशेष मोहीम राबवली. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांमधील जप्त मुद्देमाल आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई केंद्रीय मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा पोलीस सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, मीना मकवाना तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा मुद्देमाल ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११२ गंभीर गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आला होता. या कारवाईत सर्वाधिक प्रमाणात ५६४ किलो ६७४ ग्रॅम गांजा, ८५५ ग्रॅम हायब्रिड गांजा, ६ किलो ७१५ ग्रॅम मेफेड्रोन, २० किलो ९८२ ग्रॅम चरस, १०४ ग्रॅम ब्राऊन शुगर तसेच १ हजार ४६७ कफ सिरपच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या. या सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत ३९ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या विशेष पथकाने न्यायालयीन परवानग्या, नमुना तपासणी आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई यशस्वी केली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा कायमचा नायनाट करण्यात आल्याने ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि विक्रमी कारवाई मानली जात असून, अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका कायम असल्याचा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

