पुणे : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत अचूक निदान आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कर्करोग संस्थेत अत्याधुनिक पेटसिटी यंत्रणेच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने केवळ उपचारावर नव्हे, तर प्रतिबंध आणि अचूक निदानावरही शासन विशेष भर देत आहे. राज्यस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था उभारण्यात येत असून महाकेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून आधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. तसेच नागपूर येथे उच्च क्षमतेचा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्प उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यामुळे कर्करोगाचे निदान, उपचार आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, इंद्रायणी हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. संजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमार्फत अत्याधुनिक पेटसिटी यंत्रणेसाठी २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या यंत्रणेमुळे कर्करोगाचे अचूक निदान होऊन आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करणे शक्य होणार असून सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे. इंद्रायणी हॉस्पिटलने व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता रुग्णसेवेला प्राधान्य दिल्याचे कौतुक करत राज्य शासनाकडून पुढेही आवश्यक सहकार्य केले जाईल, असे सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासव्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली, तर बाबाजी काळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत इंद्रायणी हॉस्पिटल परिसरातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे कौतुक केले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि डॉ. संजय देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती घेतली आणि कर्करोगाविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

