ठाणे : कुठलेही पक्ष सत्तेत एकत्र येतात, तेव्हा त्यांचा फायदा होतो. अशाचप्रकारे हे तिन्ही पक्ष फायद्यासाठी एकत्र आले आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी भिवंडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य मंत्रिमंडळ जागा वाटपातील तिढा लवकरच सुटेल, असे सूतोवाच करत त्यांनी महाविकास आघाडीवर यावेळी टीका केली. भिवंडी येथील अंजुर परिसरात गुरुवारी भाजपाच्यावतीने आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेआधी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकासाच्या मुद्द्यावर तीन पक्ष एकत्र आले असून तिन्ही पक्षाचे नेते सक्षम आहेत. महायुतीचा फायदा तिन्ही पक्षांना होईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाला वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार आहे. पण, वेगळ्या भूमिकेमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसू नये, असे कुणीही काही करणार नाही. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांची समजूत काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्षात वर्चस्व असून त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. ते सरकारमध्ये सामील झाल्याने आमची महायुती झाली आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या वेळेसही जागा वाटपाचा तिढा लगेच सुटला नव्हता आणि ते आता आमच्यावर आरोप करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्य मंत्रिमंडळ जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, परंतु मला हा तिढा वाटत नाही. तीन पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपाबाबत चर्चा होऊनच निर्णय होईल. महाविकास आघाडीचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. पण, त्यांच्या सरकारच्या काळात कुठे एका दिवसात जागा वाटप झाली होती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जागा वाटपाचा तिढा राज्यात सुटला नाहीतर, हा तिढा राष्ट्रीय पातळीवर सुटेल. तसेच सर्वजण सरकारमध्ये असल्यामुळे कोणते खाते कुणाकडे असले तरी सर्वांना राज्याचा विकास करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.