रायगड : शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी संगम घडविणाऱ्या संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण रविवारी पनवेल येथील विरूपाक्ष सभागृहात पार पडले. महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेने अल्पावधीत समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही ही संस्था शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविणारी प्रेरणादायी चळवळ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षिका वैशाली जगदाळे यांनी समाजात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. स्थापनेपासून संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संवर्धन, सैनिकांविषयी कृतज्ञता तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. कोणत्याही शासकीय योजनेची वाट न पाहता समाजातील नागरिकांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात संस्थेला यश आले आहे. कोरोनाकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी संस्थेने सुरू केलेले शालेय पाठ्यपुस्तक आदान-प्रदान अभियान विशेष गाजले. एका विद्यार्थ्यांची पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या अभिनव उपक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळाली, तसेच पालकांचे शैक्षणिक खर्चही मोठ्या प्रमाणात वाचले. आजही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू असून अनेक कुटुंबांसाठी तो उपयुक्त ठरत आहे. याशिवाय शिक्षक दिनानिमित्त विशेष शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करून शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला जातो, तर महिला सक्षमीकरणासाठीही विविध उपक्रम राबविले जात आहेत.
संस्थेच्या वाढत्या कार्याचा विस्तार आणि अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित करण्यात आलेली अधिकृत वेबसाईट संस्थेच्या डिजिटल प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. या वेबसाईटवर संस्थेची स्थापना, ध्येय-उद्दिष्टे, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती, सदस्य नोंदणी, कार्यक्रमांचे छायाचित्र संग्रह, आगामी उपक्रम, समाजहिताच्या योजना तसेच संस्थेशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह देश-विदेशातील नागरिक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि देणगीदार यांना संस्थेच्या कार्याशी अधिक प्रभावीपणे जोडले जाणे शक्य होणार आहे. डिजिटल माध्यमातून संस्थेच्या सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासही या वेबसाईटची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उमा पारवे, ज्योती सोनार, संगीता कुंभार, सुनंदा गरड, स्वप्नील पाटील, प्रणव काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
